राज्याच्या विकास नियोजनासाठी एक अभिनव उपक्रम

विकासाचे मापन हे विकासाच्या नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. विकास सर्वदूर आणि तळागाळात पोहोचवायचा असेल, तर त्यासाठी ही मापन प्रक्रिया चोख असावी लागते. या विकास नियोजनात राज्यकर्त्यांना, धोरणकर्त्यांना मदत व्हावी या उद्देशाने ‘लोकसत्ता’ने ‘जिल्हा निर्देशांक’ हा अत्यंत नवा, महत्त्वाचा आणि दूरगामी उपक्रम हाती घेतला आहे.

कोणत्याही देशाच्या प्रगतीचा पाया हा जिल्हा असतो. स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन कसे आहे, विकासाच्या कोणत्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी स्थानिक पातळीवर होत आहे आणि कोणत्या जिल्ह्याचा मानव्य विकास निर्देशांक काय आहे त्यावर त्या जिल्ह्याच्या विकासाची दिशा आणि गती यावर अवलंबून असते. अशा विकसित जिल्ह्यांमुळे त्या-त्या प्रदेशाचा आणि अंतिमत: देशाचा विकास होत असतो. जिल्हा जितका विकसित तितकी विकासाची खोली अधिक. मात्र जिल्हास्तरावर विकासाचे मापन करायचे कसे हा एक प्रश्न योजनाकर्त्यांना नेहमी भेडसावतो. विकास योजना आखणीसाठी असे मापन अतिशय मोलाचे असते. अशा मापनाअभावी योजना आणि त्यांचे गरजवंत यांच्यात एक प्रकारची दरी राहते. ही त्रुटी ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ या उपक्रमाने दूर होईल. लवकरच या उपक्रमाच्या पहिल्या अध्यायाची घोषणा करण्यात येईल.

राज्यात विकासाची तफावत लक्षात घेता सर्व जिल्हे अर्थातच एका मोजपट्टीत मोजता येणार नाहीत. म्हणजे चंद्रपूर आणि पुणे, अथवा पाच-सहा महापालिका असलेला ठाणे आणि सिंधुदुर्ग यांची तुलना होऊ शकत नाही. म्हणून या निर्देशांकासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांची विभागणी तीन गटांत करण्यात आली असून त्यानुसार या निर्देशांकांची रचना असेल. अत्यंत पारदर्शी पद्धतीने आखण्यात आलेली ही प्रक्रिया सांख्यिकीच्या ठोस पायावर आधारित आहे.